चिकलठाणा कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या चाचणीला २ जुनचा मुहूर्त; २५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा मनपाचा अट्टहास

Foto

औरंगाबाद: शहरातील कचरा कोंडी फोडण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या  शहरातील चार प्रक्रिया केंद्रापैकी केवळ चिकलठाणा कचरा प्रक्रिया केंद्र पूर्णत्वास येत आहे. वीज जोडणी अभावी या केंद्रावर कचऱ्यावर  प्रक्रिया होत नव्हती. वीजजोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी महावितरणकडे एक निविदा आली होती.  ती अंतिम करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात वीजजोडणीचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर २ जून रोजी कचरा प्रक्रिया केंद्राच्या चाचणीचा मुहूर्त निश्चित करण्यात आलेला आहे. परंतु दिडशे टन क्षमता असलेल्या या प्रक्रिया केंद्रात अडीचशे टन कचरा प्रक्रिया करण्याचा अट्टहास मनपाने केला आहे. 
  
गेल्या वर्षी १६ फेब्रुवारी रोजी शहरातील कचरा नारेगाव कचरा डेपाेत टाकण्यास येथील नागरिकांनी मज्जाव केला होता. तेंव्हा पासून शहरात मोठ्या प्रमाणात कचरा कोंडी निर्माण झाली होती. इंदूरच्या धर्तीवर कचरा कोंडी फोडण्यासाठी मनपाने आराखडा तयार करुन शहरात खासगी ठेकेदारांकडून कचरा संकलन करण्यात येत आहेत. तसेच शहरातील चारही भागात चार कचरा प्रक्रिया केंद्र तयाार करण्यात आले आहेत. त्यासाठी ९१ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने मंजुरी देऊन हा खर्चही मनपाला दिला. त्यास एक वर्ष होऊन गेले तरी, मनपाच्या चालढकलपणामुळे अद्याप पर्यंत एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर  विधानसभेच्या दृष्टीने पदाधिकारी कामाला लागले आहेत. दरम्यान, मंगळवारी सकाळी घनकचरा विभागाची आढावा बैठक झाली. यानंतर चारही कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ठेकेदारांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी पडेगाव, कांचनवाडी, हर्सुल या तिनही प्रकल्पाचे काम आताच सुुरु झाले असून प्रकल्पाला पूर्ण होण्यासाठी किमान चार ते पाच महिने पेक्षा जास्त अवधी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चिकलठाणा प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यात जमा आहे. मात्र, विजेचा पुरवठा होऊ शकला नसल्याने एकही अद्याप यंत्र सुरु होऊ नव्हते.  आता चिकलठाण्यात एक्स्प्रेस फिडर बसवण्याच्या कामासाठी एक निविदा महावितरणकडे आली होती ती अंतिम करण्यात आली असून येत्या १५ दिवसात वीजजोडणीचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर २ जूनला चाचणी घेण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्ण ताकदीने सुरु होणार आहे. सध्या चिकलठाण्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग लागले आहेत.  

दहा जूनला लोकार्पण 
चाचणी घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १० जूनला या प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण होणार असलयाचे  महापौर नंदकुमार घोडेले यांनी यावेळी सांगितले.